“सावी ए सावी.... सासूबाई नी हाक मारली.कुरिअर वाला दारात मोठे पार्सल घेऊन उभा होता.ते बघून सासूबाईंची चिडचिड सुरू झाली.कारण असे होते की सावीची प्रेग्नन्सी टेस्ट मागच्या आठवड्यात पोसिटीव्ह आली होती आणि तिने प्रेग्नन्सी संबधित गोष्टींच्या ऑनलाईन शॉपिंग चा धडाका लावला होता.अनेक गोष्टी घरात येऊन पडल्या होत्या . त्यातील कित्येक तर कशा वापरायच्या हे धड सावी ला सुध्दा माहीत नव्हते.
सावी सारखी परिस्थिती आज अनेक तरुण जोडप्यांची असते म्हणून हा लेखन प्रपंच !
आपल्या सर्वांना माहीतच आहे की गरोदरपणाचे अनेक टप्पे असतात आणि या मध्ये प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते.त्याच प्रमाणे गरोदरपणातील खरेदीची ही एक वेळ असते असे मला वाटते. पहिली खरेदी ही बाळाचे ठोके सोनोग्राफी वर दिसले की मग करावी .कारण यामुळे बाळ जिवंत आहे (live pregnancy) याची खात्री झालेली असते.
कोणत्या वस्तूंची खरेदी या टप्यात महत्वाची आहे?
- 1. सुती आणि आरामदायी कपडे -गरोदरपणा ही hypermetabolic स्टेट आहे म्हणजे चयापचय क्रिया ही गरोदरपणात वाढलेली असते त्यामुळे उकडणे जास्त घाम येणे हे अगदी साहजिकच आहे. म्हणून गरोदरपणात वापरायचे ड्रेस हे सुती आणि comfortable असावेत.कपडे घट्ट नसावेत आणि पोटाचा घेर वाढला की त्याप्रमाणे साईज बदलत जावे.
- 2. ब्रा – स्तनाचा आकार आणि वजन गरोदरपणात अगदी सुरवाती पासून बदलते आणि वाढत जाते. या साठी स्तनांना नीट सपोर्ट मिळेल अशी ब्रेसीयर वापरणे गरजेचे आहे .नाहीतर नंतर स्तने गळून जातात.(sagging of breast) अशा योग्य ब्रा खरेदी करणे गरजेचे आहे.
- 3. पॅन्टी – योग्य साईज च्या असाव्यात आणि निदान दिवसातून दोनदा बदलाव्या. पोट वाढले की गरोदर पणा साठी च्या खास पॅन्टी मिळतात ज्या tummy ला सपोर्ट करतात त्या खरेदी कराव्यात.
- 4. सपाट चपला (flat footwear) - गरोदरपणात नेहमी सपाट चपला वापराव्या. हिल्स चे चप्पल अतिशय धोका दायक असतात .त्यामुळे पाठ दुखणे, तोल जाऊन पडणे या गोष्टी होतात म्हणून गरोदरपणात तसेच बाळाला कडेवर घेऊन चालताना सपाट चप्पल च गरजेचे आहेत ते खरेदी करावेत.
- 5. बॉडी पिलो (body pillow) - झोपताना आरामात झोपता यावे व शरीराला आधार मिळावा म्हणून याचा चांगला उपयोग होतो.
- 6. Dioderant – गरोदरपणात घाम जास्त येतो. त्यामुळे body odour पासून दूर राहण्यासाठी deoderent योग्य प्रमाणात वापरण्यास हरकत नाही.
- 7. पाण्याची बाटली – बाहेरचे पाणी पिणे गरोदर असताना टाळावे मानून स्वतः साठी मोठी पाण्याची बाटली खरेदी करावी आणि घरचे पाणी प्यावे.
- 8. सुकामेवा – नेहमी पर्स मध्ये असावा . चांगल्या प्रतीचा सुकामेवा खरेदी करून तो अधे मधे ऑफिस मध्ये खाण्यासाठी वापरावा.
- 9. संगीत – गरोदरपणात मन प्रसन्न आणि रिलॅक्स रहावे या साठी चांगले संगीत उपयोगी ठरते अशा cd तुम्ही खरेदी करू शकता.
- 10. ऑफिस पिलो – ऑफिसात सतत बसून काम असेल तर पाठीला आधार मिळेल अशी pillow विकत घेता येते आणि ती खुर्ची वर ठेऊन वापरता येते.अशीच उशी गाडीतून प्रवास करताना ही वापरता येते.
वरील सर्व गोष्टी या गरोदरपणाच्या पहिल्या टप्प्यात गरजेच्या आहेत.
आता पुढच्या टप्प्या विषयी विचार करू या !
खरेदी च्या दृष्टीने पुढचा टप्प्या सुरु होतो २० आठवड्याच्या अर्थात ५ व्या महिन्याच्या सोनोग्राफी नंतर...कारण या सोनोग्राफी मध्ये बाळात काहीही दोष नाही आणि ते पूर्णपणे निरोगी आहे याची खात्री करण्यात येते.म्हणून बाळासाठी लागणारी खरेदी तसेच आईला डिलीव्हरी च्या अनुषंगाने लागणारी खरेदी करण्यास आता हरकत नसते.
आपल्याकडे अजूनही मोठी माणसे बाळासाठी ची नवी खरेदी ही त्याच्या जन्मानंतर करावी असे मानतात.पण पाश्चात्य देशाप्रमाणे आपल्या कडची परिस्तिथी सुध्दा झाली आहे मदत करण्यासाठी माणसे मिळणे अवघड होऊ लागले आहे त्यामुळे बरेच वेळा लोक आजकाल ही खरेदी सुद्धा आधी करून ठेवू लागले आहेत असो.
बाळासाठी लागणाऱ्या गोष्टी मध्ये,
- 1. टोपडी, झबली ,चांगल्या पद्धतीचे लंगोट (cozy care लंगोट) जे थोडे जाड आणि supportive असतात,तेल, साबण , पावडर, तसेच दुपटी याचा समावेश आहे. कॉटन च्या साड्या किंवा ओढण्याचा बाळासाठी दुपटी शिवायला चॅन उपयोग होतो.ही दुपटी मऊ असल्याने बाळाच्या त्वचेला त्रास ही होत नाही आणि विकतच्या दुपट्या पेक्षा या मध्ये मायेचा गंध असतो.अशी दुपटी आजकाल खास शिवून मिळतात.
- 2. बाळाच्या अंघोळीसाठी टब- अतिशय उपयोगी आणि अगदी नुकत्याच जन्मलेल्या बाळाला या मध्ये सुरक्षित आंघोळ घालता यावी म्हणून स्पेशल aatachment मिळते.
- 3. कॅरी कॉट – यामध्ये तान्हे बाळ आरामात झोपू शकते आणि तुम्ही त्याला उचलून कोठेही नेऊ शकता.
- 4. Pram अथवा स्टोलर – बाळाला घराबाहेर नेताना खूप उपयोगी पडतो. मुले 2 वर्षा पर्यंत यात बसू शकतात आणि एन्जॉय ही करतात. बाळाचे वजन जसे वाढते तसे त्याला कडेवरून सगळीकडे नेणे फार अवघड जाते यासाठी स्ट्रोलर ची सवय मुलांना जन्मात: च लावावी. सुरवातीला कोवळे ऊन दाखवायला बाळाला नेतात तेव्हा पासून तुम्ही स्ट्रोलर वापरू शकता.
- 5. पाळणा आणि त्याला बांधायचे गोल फिरणारे खेळणे – पाळण्यात बाळ सुरक्षित राहते तुम्ही काम करताना बाळाला पाळण्यात ठेवलेले असले की चिंता वाटत नाही पाळण्याची सवय पण मुद्दामहून लावावी लागते. पाळण्यावर बांधायला एक चक्राकार फिरणारे खेळणे मिळते. ते खूप महत्वाचे काम करते. बाळाची दृष्टी ही साधारण २ ऱ्या महिन्यात स्थिर होते ह्या खेळण्यामुळे दृष्टी स्थिरावण्यास मदत होते तसेच बाळ डोळे चक्राकार फिरवून त्या खेळण्याचा डोळ्याने पाठलाग करायला शिकते ही सुद्धा महत्वाची स्टेप आहे.
- 6. डायपर- आजकाल हे फार गरजेचे झाले आहेत.पूर्वी काही कंपन्याचे थायलंड मेड डायपर मिळायचे ते जास्त सॉफ्ट आणि हलके असतात त्यामुळे बाळाला रॅश कमी यायचा.
आता आई साठी या टप्प्यात काय खरेदी करावे लागेल ते पाहूया.डिलीव्हरी नंतर आईचे मुख्य काम म्हणजे बाळाला स्तनपान करणे. हे स्तनपान सुलभ व्हावे म्हणून लागणाऱ्या गोष्टी म्हणजे,
- 1. फीडिंग गाऊन, फीडिंग टी शर्ट, फीडिंग ब्रा इत्यादी गोष्टी ची खरेदी आवश्यक असते.
- 2. फीडिंग pillow – या खास उशीवर बाळाला ठेऊन स्तनपान करणे सोपे जाते . आईला वाकायला लागत नाही त्यामुळे पाठदुखी होत नाही.
- 3. सॅनिटरी नॅपकिन – डिलीव्हरी नंतर हॉस्पिटलमध्ये जे नॅपकिन देतात ते बहुदा पेशंट ला comfortable नसतात त्यामुळे तुम्ही नेहमी वापरत असलेले सॅनिटरी नॅपकिन जास्त प्रमाणात खरेदी करून ठेवावेत.
वर सांगितल्या प्रमाणे इतर गोष्टी जसे की कपडे , चपला ह्या नीट असणे इथेही महत्त्वाचे आहे.
इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की पहिल्या टप्यात आई साठी ची खरेदी जास्त आहे तर दुसऱ्या टप्प्यात बाळासाठी ची ! हा निसर्गाचा नियम च आहे नवनिर्मिती ची तयारी तो जोरात करतो. त्याचे स्वागत तो आनंदाने करतो.
या लेखाचा हेतू हा योजनाबद्ध तयारी होणाऱ्या नवीन आईबाबांना करता यावी , त्यांचा गोंधळ कमी व्हावा हा होता. तसेच इतरांनी सुद्धा नव्या बाळंतिणीला काय वस्तू भेट द्याव्या हे कळावे हा होता. बारशाला किंवा पहिल्या वाढदिवसाला लोक तीनचाकी सायकल भेट देताना मी कित्येक वेळा पाहिले आहे जी 3 वर्षे पडून राहते. (तीन चाकी सायकल तिसर्यावर्षी हा सायंटिफिक नियम आहे)