आज मुद्दामहून दुसऱ्या प्रेग्नन्सी बद्दल लिहावेसे वाटले. आपल्या ’ पुला’ ग्रुप वर याबद्दल मी अनेक वेळा चर्चा वाचली आहे. एक स्त्री म्हणून, दोन मुलांची आई म्हणून आणि एक स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून मला दुसरी प्रेग्नन्सी नेहमीच महत्वाची वाटत आली आहे. कुटूंबाला पूर्णत्व येण्यासाठी आणि पहिल्या मुलाच्या निरोगी वाढीसाठी 2nd चान्स घेणे योग्य आणि गरजेचे आहे असे मी म्हणेन.
पहिल्या मुलाच्या निरोगी वाढीसाठी म्हंटल्यावर अनेकींना आश्चर्य वाटले असेल .तर या संदर्भात चीन मध्ये एक मोठी ट्रायल घेण्यात आली होती. चीन ने लोकसंख्या कमी करण्यासाठी ‘एक परिवार एकच मूल’ही संकल्पना राबवली होती . यामध्ये असा निष्कर्ष निघाला की एक च मूल असल्याने मुलाचे आई वडील आणि दोन्ही कडचे आजी आजोबा या सर्वांचा वारस ते एकटे मूल! (मुलाचे आई वडील पण एकुलते एकच म्हणून वाढले असल्याने) मग या सहा मोठ्या लोकांचा केंद्र बिंदू हे एकच मूल! यामुळे ही मुले आळशी आणि प्रचंड हेकेखोर व हट्टी बनली.कोणतीही तडजोड , कमीपणा घेणे या पिढीला माहीतच नव्हते .आणि त्यामुळे तरुण वयात जवळ जवळ एका पिढीची युवाशक्ती वाया गेली.
म्हणून म्हंटले पहिल्या मुलाच्या निरोगी वाढीसाठी आणि मानसिकतेसाठी दुसऱ्या मुलाचा विचार करणे नेहमी योग्य !
तसेच आज कालच्या ‘मॉडर्न आणि सुपरफास्ट ‘ जीवनशैली मध्ये एकच मूल असताना त्याला काही कमीजास्त झाले तर मग पुढे काय? याचा विचार ही योग्य वेळी केला पाहिजे आणि वेळेतच दुसरा चान्स घ्यायला हवा असे मला वाटते.कारण एकदा वय निघून गेले की मग पश्चातापा शिवाय काहीही हातात रहात नाही हेच खरे!
आता 2nd चान्स घेणे हे कोणकोणत्या गोष्टीवर अवलंबून असते ते पाहूया.
- 1. मानसिकता - श्रेया आणि सुजय आज मला खास भेटायला आले होते . ते दुसरी प्रेग्नन्सी प्लॅन करत होते दोघेही करियर करत असल्याने दुसरा चान्स घेताना त्यांना काय काय बदल करावे लागतील म्हणजे ही प्रेग्नन्सी त्यांना सोपी जाईल हे त्यांना जाणून घ्यायचे होते आणि त्याप्रमाणे शक्य तितके बदल करून ते आनंदाने 2nd चान्स घेणार होते. या उलट निशा आणि राहुल यांना निशा होममेकर असून सुद्धा 2nd चान्स अजिबात घ्यायचा नव्हता. म्हणजे तुमची मानसिकता कशी आहे या वर बहुतांश सगळे अवलंबून असते. जर मानसिक दृष्टया दुसरे मूल हवे हे निश्चित असेल तर त्यासाठी माणूस बाकीच्या तडजोडी जसे की आर्थिक तडजोड, करियरच्या बाबतीत ली तडजोड इत्यादी आनंदाने करतो आणि त्यात यशस्वी ही होतो.
आता ही मानसिकता कशावर अवलंबून असते? आर्थिक स्तिथी किंवा करियर या पेक्षा या निर्णयात मला वाटते की माणूस ज्या समूहात राहतो त्याचा त्याच्या प्रत्येक निर्णयावर परिणाम होत असतो. कारण मुळातच माणूस हा समूहप्रीय प्राणी आहे. उदा. माधवी च्या ऑफिस मधील सगळ्या मित्रिणींनी दुसरा चान्स घेतला , आपोआप च जी माधवी पहिल्या मुलानंतर बास म्हणत होती तिनेही न घाबरत दुसरा चान्स घेतला.सविताच्या सगळ्या जावा ना दोन मुले होती; त्यामुळे तिला ही दुसरी प्रेग्नन्सी हवी हा निर्णय घेणे सोपे गेले.शीतल ने तिची शेजारी स्नेहा ने दुसरा चान्स घेतल्यावर स्नेहाच्या पहिला मुलगा निरव मध्ये होणारे पॉझिटिव्ह बदल स्वतः बघितले आणि शितालचा दुसऱ्या बाळाचा निर्णय पक्का झाला.या उलट आजकाल 2nd चान्स घेणार म्हंटल्यावर ‘ अरे बापरे, दूसरे मूल? कस काय परवडणार तुम्हाला? आम्ही नाही बाबा त्या फंदात पडलो; इतकी जवाबदारी कशी पेलवणार?” असे म्हणून घाबरवून टाकणारे लोक आजूबाजूला असतील तर साहजिकच जोडपी एकदम बॅकफूटवर जातात आणि निगेटिव्ह च विचार करू लागतात.
सारांश ... 2nd चान्सचा निर्णय हा मानसिकतेवर आणि मानसिकता ही आपण ज्या समूहात राहतो त्यावर बरेचदा अवलंबून असते.
- 2. आर्थिक परिस्थिती हा घटक दुसऱ्या बाळाचा निर्णय घेताना नक्कीच महत्वाचा आहे पण व्यवस्थित आर्थिक प्लॅनिंग आणि योग्य ठिकाणी काटकसर केल्यास आजही दुसरे मूल वाढवणे अवघड नाही असे मला वाटते. आर्थिक दृष्ट्या दुसरे मूल परवडत नाही म्हणून सांगणाऱ्या तनिष्काला चाळीस चपलांचे जोड, भरपूर कपडे, आठवड्यातून एकदा हॉटेलिंग, वर्षातून एकदा परदेशी ट्रिप हे सहज परवडत होते... नीट नियोजन केले तर आणि गरजेपेक्षा जास्त वस्तूंवर चा खर्च टाळला तर तुम्ही तुमच्या पहिल्या मुलाला ‘भावंड असण्याची श्रीमंती’ देऊ शकता. आणि या भावंड असण्याच्या श्रीमंती इतकी त्याला आणि तुम्हाला आयुष्य भर पुरेल इतकी दुसरी कोणती शिदोरी असू शकेल का? आपल्या पिढीने ही भावंड असण्याची श्रीमंती पुरेपूर अनुभवली आहे आणि त्यामुळे मिळणारे सुख सुद्धा... मग यावर आपल्या मुलांचा अधिकार नाही का? या बाबतीत रुचिका चे उदाहरण अगदी बोलके आहे. दुसऱ्या बाळाच्या वेळी रुचिका माझ्याकडे तपासणी साठी येत असे. तिची परिस्थिती नवश्रीमंत मध्यम वर्गातील होती ... सहज तिला म्हटले दुसऱ्या मुलाची जवाबदारी तुम्हाला पेलवेल का ग? इतका खर्च असतो आजकाल.... यावर तिने दिलेले उत्तर होते.... ‘अगदी नक्की डॉक्टर, कदाचित मी माझ्या दोन्ही मुलांना A1 श्रेणीची प्रत्येक गोष्ट (कपडे, शाळा, मनोरंजन इत्यादी) देऊ शकणार नाही पण A2 श्रेणीचे तरी सगळे वाईट कुठे असते, चांगलेच असते की आणि या तडजोडी मुळे जर माझ्या दोन्ही मुलांना भावंडांचे सुख मिळणार असेल तर ते सर्वोच्च नाही का?’ मी तिचे उत्तर ऐकून फार आनंदी झाले आणि असाही विचार करणारे लोक आहेत हे फार बरे वाटले. सारांश.... आर्थिक स्थिती हे दुसरे मूल होऊ न देण्याचे महत्वाचे कारण असले तरी सर्वात महत्वाचे कारण नाही असे मला वाटते.
- 3. करियर. ..करियर मुख्यत: मुलींचे हे पहिली वेळ असो वा दुसरी नेहमीच एक महत्त्वाची समस्या असते. मुले आणि नोकरी या मधे समतोल साधणे म्हणजे तारेवरची कसरत. तरी पहिल्या वेळी आपण बरेचदा निभावून नेतो पण दुसऱ्या प्रेग्नन्सी च्या वेळी बहुतेकजणी करियरच्या अश्या टप्प्यावर असतात की आता ब्रेक घेतला तर परत पहिल्या पासून सुरवात करणे फार अवघड असते. मग दुसऱ्या प्रेग्नन्सी साठी करियर सोडून द्यायचे का? मुळीच नाही; पण थोडी बॅकसीट घ्यायला काय हरकत आहे? म्हणजे प्रमोशन वगैरे च्या मागे न लागता आपण एका स्थिर गतीने काही वर्षे काम करू शकतो का? हे तपासून पहावे. शेवटी कितीही प्रमोशन मिळाले तरी एक दिवस आपण रिटायर होणार आहोत आणि त्या वेळेला आपल्या कुटुंबा व्यतिरिक्त बाकीच्यांचा आपल्याला काही उपयोग होणार नाही हे सत्य असते. मग अशा कुटूंबाचा समतोल साधण्यासाठी आपण काही वर्षे करियरच्या बाबतीत बॅकसीट घेतली तर काय हरकत आहे? कदाचित पार्ट टाईम नोकरी मध्ये सर्व बेनिफिट्स मिळत ही नसतील; पण तुम्ही तुमच्या फील्ड च्या टच मध्ये राहता, तुमच्या सहकाऱ्यांच्या टच मधे राहता, करियर अगदीच सोडून न दिल्याने मानसिक समाधान ही असते आणि गडबडीची काही वर्षे संपली की पाहिजे तेव्हा तुम्ही परत पूर्ण वेळ काम करू शकता. ‘दुसरे मूल’ ही इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट करत असताना पार्ट टाईम नोकरीमुळे थोडे आर्थिक नुकसान झाले तरी त्याचे लॉंग टर्म फायदे जास्त असतात असे मला वाटते.
- 4. सपोर्ट सिस्टीम - सपोर्ट सिस्टीम हा दुसरा चान्स घेताना महत्त्वाचा मुद्दा आहे. इथे आपण हे लक्षात घ्यायला हवे की आपली मुले ही पूर्णपणे आपली जवाबदारी असते आणि सासू सासऱ्या यामध्ये गृहीत न धरता नवरा बायकोने ही सपोर्ट सिस्टीम स्वतः निर्माण करायला हवी. मुलांची वाढत जाणारी शक्ती आणि सासू सासऱ्यां ची कमी होत जाणारी शक्ती याचा मेळ बसत नाही त्यामुळे त्यांना शारीरिक दृष्टीने लहान मुले सांभाळणे अवघड असते. स्वतः सासू सासरे किंवा मुलीचे आई वडील ही जबाबदारी आनंदाने व त्यांच्या मर्जीने स्वीकारत असतील तर गोष्ट वेगळी; पण त्यांना गृहीत धरू नये कारण वयोमाना नुसार त्यांना येणाऱ्या शारीरिक मर्यादा ! इथे मला हे ही सांगावेसे वाटते की, पहिल्या मुलाच्या अनुभवामुळे दुसरे मूल वाढवणे हे बरेच सोपे जाते. का ? ते सांगता नाही येणार मला, पण दुसरे मूल कधी पटापट मोठे होते ते समजत ही नाही... आणि दुसऱ्या च्या येण्याने पाहिले मूल ही आपोआप म्याच्युअर होते. आधी च्या लेखात म्हटल्याप्रमाणे दोघांच्या पैकी एकाने बॅकसिट घेतली तर हा काळ निभावून नेणे अवघड जात नाही असे मला वाटते. त्यामुळे या बद्दल ची भीती न बाळगणे योग्य. मुलांना पाळणाघरात ठेवणे योग्य की अयोग्य हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे आणि त्याबद्दल मी फारशी अनुभवी नाही.
- 5. वय - आजकाल उशिरा होणाऱ्या लग्ना मुळे मूल होण्याचे वय ही पुढे गेले आहे. पाहिले मूल 30व्या वर्षी आणि दुसरे 3५ वर्ष्याच्या आत हे अगदी सर्रास आढळणारे चित्र आहे. गरोदरपणात करू शकणाऱ्या ऍडव्हान्स टेस्ट मुळे सर्व साधारण पणे 3५ वर्षा पर्यंत ची प्रेग्नन्सी सुरक्षित आहे असे म्हणता येईल. त्यामुळे तिशी च्या पुढच्या प्रेग्नन्सी चा बाऊ न करता योग्य तज्ञानच्या देखरेखी खाली 2nd चान्स घेणे सयुक्तिक आणि सुरक्षित आहे.
३५ ते ३७ या काळात ल्या प्रेग्नन्सी चा विचार आपल्या ला individual केस नुसार करावा लागेल , तर ३७ वर्षा नंतर च्या प्रेग्नन्सी चा विचार आपल्याला ‘स्पेशल केस’ म्हणून करावा लागेल(वय वर्षे ४० पर्यंत यशस्वी रित्या दुसरा चान्स घेणारे पेशंट मी बघितले आहेत)
- 6. मेडिकल प्रॉब्लेम – पहिल्या गरोदरपणात आलेले मेडिकल प्रोब्लेम हे दोन प्रकारचे असू शकतात.
- - पुन्हा पुन्हा उदभवणारे
- - एकदाच उदभवणारे
तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास पहिल्या वेळी झाला होता त्यावर दुसरा चान्स घेऊ शकाल की नाही हे अवलंबून आहे.त्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
- 7. दत्तक घेणे - हा विषय खूप गहन आहे आणि विशेषत: दुसरे मूल दत्तक घेणे हा मोठा निर्णय आहे. हा निर्णय नवराबायको ने पूर्ण विचार करून घ्यायला हवा.. कारण यामध्ये दोन्ही मुलां पैकी एकाला झुकते माप दिले जाण्याची खूप शक्यता असते.आपले मन असे उजवे डावे होऊ देणार नाही इतके खंबीर असेल तरच या बाबतीत पुढे जावे अन्यथा कुटूंबाचा समतोल ढळण्याची शक्यता जास्त असते.मूल नसताना दत्तक घेणे आणि एक मूल असताना दुसरे दत्तक घेणे या मध्ये हा मूलभूत फरक आहे.
- 8. जनसंख्या आणि दुसरे मूल - आता थोडा ‘ब्रॉड माईंड’ ने विचार करूया .... इथे मला एक नवा दृष्टी कोन मांडावासा वाटतो.
आजकाल जोडपी एकच मूल बास किंवा मुले नकोत च असा विचार करतात (याला DINK म्हणजे ‘डबल इनकम नो कीड’ संस्कृती म्हणतात) आज आपला देश युवाशक्ती च्या बाबतीत समृद्ध आहे.या उलट पाश्चात्य देश आता सध्या ‘युवाशक्ती ची कमतरता’ या संकटाचा सामना करत आहेत. त्यांच्या कडे काम आहे पण कुटुंब पद्धती नसल्याने प्रत्येक जण मूल होऊ देत नाही त्यामुळे त्यांच्याकडे युवा शक्ती नाही आहे आणि त्यामुळे मनुष्यबळ (ह्यूमन रिसोर्स) तिथे प्रचंड महाग आहे. मग ते काय करतात ; तर त्यांचे काम कमी पैशात आऊट source करून आपल्या युवा शक्ती कडून करून घेतात आणि त्यांच्या देशाचा विकास साधतात.( तुमच्या पैकी कित्येक जणी MNC मध्ये काम करत असतील आणि तुम्हाला UK आणि USA शिफ्ट प्रमाणे वेळा ऍडजस्ट करून नोकऱ्या कराव्या लागत असतील). अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशानी ही बाब केव्हाच ओळखली आहे म्हणून ते त्यांच्या नागरिकांना 3 किंवा जास्त मुले होऊ देण्यासाठी प्रोत्साहन देतात . कारण त्यांच्या देशाच्या प्रगती साठी त्यांना त्यांची स्वतः ची युवाशक्ती हवी आहे .म्हणजे आपण किंवा चीन यावरचा त्यांचा dependance कमी होईल.आणि ते आपल्याला dominate करू शकतील आणि सुपर पॉवर होतील.
थोडक्यात आपण कमी मुले होऊ देऊन आपली युवाशक्ती आणि प्रगती खाली नेत आहोत , तर ते जास्त मुले होऊ देऊन त्यांची शक्ती वाढवत आहेत. हा प्रचंड मोठा धोका नाही का?कोणत्याही देशाची प्रगती ही युवाशक्ती वरच अवलंबून असते हे साधे गणित आहे . आणि आपला देश आज या बाबतीत समृद्ध आहे. पण भविष्य असे असेलच असे नाही.
(मागच्या वेळ च्या लेखावर काही जणींना दोन मुले झाल्या मुळे लोकसंख्या वाढून देशाची प्रगती थांबेल असे वाटत होते म्हणून विस्तृत लिहिले)
- 9. काही जणींनी प्रतिक्रिया मध्ये म्हटले आहे की बायकांनी च बॅक सीट का घ्यायची ... तर याचे उत्तर निसर्ग असे मी म्हणेन.. ‘मातृत्व’ ही स्त्री ला मिळालेली अमूल्य देणगी आहे , मग इथे स्त्री पुरुष समानतेचा मुद्दा खर तर येऊ नये... पण यातही असे सांगेन की ही बॅक सीट काही कायमची स्त्री लाच घ्यावी लागेल असे नाही. पहिली दोन वर्षे बाळ आई वर जास्त अवलंबून असते , तेव्हा जर तडजोड करून निभावून नेले तर नंतर कोणी बॅक सीट घ्यावी हे त्या जोडप्यांने ठरवायचे असते. आई इतकेच मुलाच्या संगोपनात भाग घेणारे वडील हे चित्र पुण्या सारख्या शहरात आता कॉमन होऊ लागले आहे आणि त्यामुळे वडील आणि मुले यांचा मध्ये सुंदर भावबंध तयार झालेले मी पाहिले आहे.
सारांश - दुसरी प्रेग्नन्सी ही जर नीट नियोजन केले तर अवघड नाही आणि तिचा विचार वेळेतच करायला हवा.
दुसरा चान्स घ्यायचा की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे ; पण शक्य असेल तर तो जरूर घ्यावा त्याचा कंटाळा किंवा आळस नसावा असे वाटते.
तुमच्या प्रतिसदाची वाट बघत आहे.