जशी पिढी बदलते तसे माणसाचे विचार ही बदलत जातात आणि नवीन नवीन कल्पना रुजतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वी च्या पिढीतील जोडपी ही मुले बंद करण्यासाठी ' कुटूंब नियोजन' या कल्पनेचा वापर करत असत तर आजच्या पिढीतील जोडपी ही मुले होऊ देण्यासाठी 'नियोजन' (planning) करतात. गेल्या दहा वर्षात अशा 'नियोजित गर्भधारणेचे'(planned pregnancy) प्रमाण ६०% नी वाढले आहे. बदलती जीवनशैली हे या मागचे मुख्य कारण !
सर्वात पहिला प्रश्न म्हणजे गर्भधारणा ही नैसर्गिक गोष्ट आहे तिचे असे नियोजन करणे योग्य आहे का? तर एक स्त्री रोग तज्ञ म्हणून मी असे म्हणेन की ," जी गर्भधारणा (pregnancy) कोणतेही नियोजन न करता होते त्या मध्ये बाळ सुदृढ आणि निरोगी असण्याची शक्यता सर्वात जास्त असते." कारण अशा गर्भधारणेच्या वेळी कोणताही 'ताण'(stress) त्या जोडप्याला नसतो.
मग मुले होऊ देण्याचे नियोजन करायचेच नाही का? असे अजिबात नाही. पण असे नियोजन करताना त्या जोडप्याने काही गोष्टींचा गंभीरपणे विचार करायला हवा.
जर पत्नी ची पाळी अनियमित असेल किंवा पतीच्या वीर्य तपासणी मध्ये काही दोष असेल तर प्रेग्नंन्सी पुढे ढकलणे चांगले नाही. म्हणून जेव्हा तुम्ही ' नियोजित गर्भधारणेचा' (planned pregnancy ) चा विचार पक्का करता तेव्हा स्त्री रोग तज्ञाना दाखवून त्यांचा सल्ला घेणे योग्य होईल.
किती दिवस किंवा किती वर्षे तुम्हाला प्रेग्नंन्सी नको आहे असे विचारले असता ' साधारण २ते ३वर्षे नको डॉक्टर' असे सर्वसाधारण उत्तर असते आणि नंतर काही प्रॉब्लेम नाही येणार गरोदर राहायला अशी हमी सुद्धा पेशंट ला हवी असते. अशी हमी देणे हे कोणत्याही स्त्री रोग तज्ञाला शक्य नसते कारण या काळात जोडप्या मध्ये शारीरिक तसेच हार्मोनल बदल होऊ शकतात ज्यामुळे गर्भधारणा होणे अवघड होऊ शकते.
अश्या काही टेस्ट आहेत का की ज्या जोडप्या ची प्रजनन क्षमता (fertility assessment tests)मोजू शकतात ? याचे उत्तर आहे 'होय' अशा तपासण्या उपलब्ध आहेत की ज्या या घडीला त्या विशिष्ट जोडप्या ची प्रजननक्षमता किती आहे याचा ठोकताळे बांधू शकतात पण तुम्ही प्रेग्नंन्सी किती काळ पुढे ढकलू शकता या चे उत्तर त्या टेस्ट देऊ शकत नाहीत उलट तुमच्या कडे थांबायला अजिबात वेळ नाही आणि लगेच प्रेग्नंन्सी प्लॅन करणे गरजेचे आहे हे मात्र या टेस्ट सांगू शकतात.
पती आणि पत्नी या दोघांच्या सर्व चाचण्या (tests) निर्दोष (नॉर्मल) असल्यातरी २०% जोडप्यांना गर्भधारणे साठी अडचण येते आणि त्याला कोणतेही कारण सापडत नाही (unexplained infertility)
वरील सर्व गोष्टींचा विचार हा बहुतेक वेळा तरुण जोडप्यांनी गांभीर्याने केलेला नसतो त्यांच्या मनात एकच पक्के असते की "आम्हाला इतक्या लवकर प्रेग्नंन्सी नको" . घरातील वडील माणसे जे सांगतात ते सुद्धा ही तरुण मंडळी ऐकत नाहीत. कित्येक जोडपी तर घरातील मोठ्या माणसांच्या अपरोक्ष प्रेग्नंन्सी पुढे ढकलत असतात!
या सगळ्या मुळे होते काय की जेव्हा गर्भधारणा सहज शक्य असते तेव्हा तरुण जोडपी ती अगदी सहज पुढे पुढे ढकलत राहतात आणि जेव्हा त्यांच्या नियोजना(planning) प्रमाणे त्यांना प्रेग्नंन्सी हवी असते तेव्हा निसर्ग साथ देतो च असे नाही परिणामतः प्रेग्नंन्सी ला उशीर होत जातो. वाढते वय, बदलत्या जीवनशैली मुळे झालेले हार्मोनल बदल, शरीरात असणारे आणि पूर्वी निदान न झालेले रचनात्मक दोष (tubal block, incompetant cervix, uterine anamolies, azoosprrmia ) ही त्याची काही कारणे आहेत.
या सगळ्या चा सुवर्ण मध्य साधताना असे म्हणेन,
"पहिली प्रेग्नंन्सी केव्हा?? तर जितक्या पटकन शक्य असेल तेव्हा" !