"वैदेही...वय वर्षे २८. एक अखंड उत्साहाचा झरा.. सुंदर, लाघवी एका MNC मध्ये टीम लीडर. स्वतः चे निर्णय धडाडीने घेऊन कोणतही काम वेळेच्या आधी पूर्ण करणारी. त्यामुळे तिची अशी एक पॉझिटिव्ह ‘इमेज’ होती कंपनी मध्ये . घरी ती आणि सुशांत दोघेच तो ही तिला अगदी अनुरूप ; प्रत्येक गोष्टीत तिला बरोबर घेऊन चालणारा.
सकाळी उठून वेळेत व्यायाम , डाएट चा ब्रेकफास्ट आणि मग ९ वाजता घर सोडले की रात्री ९ ला च दोघे घरी येत. विकेंड ला मस्त हिंडायचे ट्रेकिंग आणि पार्टीज... आयुष्य मस्त जगत होते.... नवीन पिढीच ही; मग प्रेग्नंन्सी चे प्लॅनींग ही परफेक्ट होते त्यांचे... लग्नानंतर 2 वर्षात स्वतः चे घर घेतले आणि आर्थिकस्थैर्य आल्यावर आत्ता तिसऱ्या वर्षी प्लॅन केल्याप्रमाणे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली सगळं कसं आखीव रेखीव सुरु होते.पण..... जशी टेस्ट पॉझिटिव्ह आली तशी वैदेही ला उलट्या मळमळ सुरू झाली.. काही खाता येईना, अशक्त पणा आला , रात्री सारखे बाथरूम ला उठावे लागे त्यामुळे झोप नीट होईना, पोट नीट साफ होईना चीड चिडेपणा वाढला(ही सगळी प्रेग्नंन्सी ची नॉर्मल लक्षणे असतात आणि तुमचे बाळ नीट वाढत आहे हे दर्शवतात ) तिचे सगळे रुटीन च बिघडले. त्यातच मला दाखवून गेल्यावर मी तिला तपासून काही औषधे लिहून दिली आणि आता काय काय काळजी घ्यायला पाहिजे जसे की ट्रॅव्हलिंग नको, बाहेरचे खाणे टाळावे, रात्री 8 तास झोप घेणे आवश्यक आहे आणि हेवी आणि पोटाचे व्यायाम नको असे सांगितले.
इतके सगळे शारीरिक बदल आणि घ्यायची काळजी याच्याशी जुळवून घेताना तिची तारांबळ उडाली. ऑफिस मध्ये तिला गरज पडेल तशी रजा आता घ्यावी लागत असे, रात्री उशिरा पर्यंत पूर्वी सारखे काम करणे शक्य होईना, तिच्या परफॉर्मन्स वर परिणाम होऊ लागला तिच्या कलिग्ज आणि सिनियर्स चा ही असता ती गरोदर आहे म्हटल्यावर तिच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.(हे तुमच्या पैकी खूप जणींनी अनुभवले असेल)लवकरच ती सुट्टी वर जाणार म्हटल्यावर मुख्य डिसीजन्स घेताना पूर्वी इतके तिच्या मताला महत्व दिले जाईना, तिला तिच्या कामाची ओव्हर दुसऱ्या कलिग ला देऊन साधे काम करण्याचा सल्ला देण्यात आला.
आधीच शारीरिक बदल आणि प्रेग्नंन्सी मूळे आलेली बंधने ( ट्रेकिंग आणि पार्टीज बंद, बाहेर खाणे बंद ) त्यात च ऑफिस मध्ये कमी झालेले तिचे महत्व, तिने सुट्टी घेतली तरी सुशांत सकाळी ऑफिस ला गेला की पूर्वीसारखा रात्रीच घरी येत असे त्याला आपले काम कमी करणे नेहमी शक्य होत नसे त्यामुळे तिला घरी आलेला एकटे पणा या मुळे ती ‘नैराश्याच्या गर्तेत’ सापडली आणि सुशांत घाबरून तिला माझ्या कडे समुपदेशना साठी घेऊन आला.
दुसरी केस प्रियांका ची . प्रियांका ‘होममेकर’! लग्नानंतर मस्त चालले होते.ती , नितीश सासू सासरे आणि लहान दीर असे एकत्रच राहात. चुणचुणीत प्रियांका ने सर्वाना आपलेसे करून टाकले होते आपल्या वागण्याने... रोजची घरची बाहेरची कामे , सणवार,पै पाहुणे, कुळाचार सारे काही ती अगदी धडाडीने सांभाळत असे . त्यामुळे प्रियांकाचे नेहमी गुणगान होत असे घरातील सर्व गोष्टी तिला विचारून च केल्या जात. तीन वर्षे पटापट सरली आणि प्रियांकाने गोड बातमी दिली सगळे खूष!पण या बरोबर चालू झालेल्या उलटी मळमळ आणि इतर लक्षणांनी प्रियांका बेजार झाली तिला पूर्वी सारखी प्रत्येक गोष्ट परफेक्ट आणि वेळच्या वेळी जमेना....त्यातच लहान दिराचे नुकतेच लग्न झाले होते त्यामुळे नवीन ‘ जाऊ’आता घरातील सर्व गोष्टी सांभाळू लागली . साहजिकच आता तिचे गुणगान होत असे आणि आता तिच्या मताला जास्त किंमत दिली जाई. शारीरिक बदल आणि बदलती परिस्थिती यामुळे प्रियांका ‘नैराश्याच्या गर्तेत’ सापडली .
अशा कितीतरी वैदेही आणि प्रियांका ज्या प्रेग्नंन्सी च्या पहिल्या तीन महिन्यात ‘नैराश्याच्या गर्तेत’सापडतात त्यांना आम्ही पाहतो. आणि याचे मुख्य कारण म्हणजे ‘प्रेग्नन्सी साठीची मानसिक तयारी आणि मनाची मशागत केलेली नसणे’.
आजकाल सजगतेमुळे नवीन लग्न झालेली जोडपी आर्थिक तयारी पूर्ण झाल्यावरच मुलाचा विचार करतात पण कित्येक वेळा ही जोडपी मानसिक तयारी न करताच प्रेग्नंन्सी ला सामोरी जातात आणि मग परिस्थिती शी जुळवून घेता घेता बेजार होतात.
पूर्वी प्रेग्नंन्सी शी निगडित असणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स चे प्रमाण २०% होते, म्हणजे ८०% स्त्रियांना गरोदरपणात काही अडचण न येता त्या सहज आपले गरोदरपण निभावून नेऊ शकत असत . कुटूंबातून असलेला मानसिक आधार हा त्याचे मुख्य कारण होते.
बदलती जीवनशैली, उशिरा लग्न त्यामुळे उशिरा प्रेग्नंन्सी, विभक्त कुटुंब पद्धती , आहारातील बदल, वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणा(यामुळे कित्येक धोके आपण आधीच ओळखू शकतो) यामुळे आता प्रेग्नंन्सी कॉम्प्लिकेशन्स चे प्रमाण आता ४०% पर्यंत वाढले आहे. म्हणजे तुम्ही जर ६०% च्या गटात आला तर तुमची प्रेग्नंन्सी सहज पणे पार पडते; पण जर तुम्ही उर्वरित ४०% च्या गटात आला तर मात्र तुमची अशा परिस्थितीला सामोरं जाण्याची मानसिक तयारी हवी.
मानसिक तयारी म्हणजे नक्की काय करायचे?
पहिली पायरी म्हणजे ‘आता मी गरोदर आहे आणि पुढचे ९महिने माझे बाळ हीच माझी पहिली जवाबदारी आहे त्यामुळे त्याच्यासाठी जरुरी असणाऱ्या सर्व गोष्टी मी आनंदाने करणार आहे ‘ हे स्वतः ला पुन्हा पुन्हा सांगायचे.अशी सकारात्मक मानसिकता तयार झाली की बऱ्याच गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलतो आणि मग लहान सहान गोष्टींचा आपल्या ला त्रास होत नाही.
सारांश – आर्थिक तयारी बरोबरच पुरेशी विश्रांती, जीवनशैली तील आवश्यक असे लहान सहान बदल,गरज पडेल तेव्हा राजा घेणे आणि ९महिने बाळासाठी सर्वोत्तम असे बदल करण्याची मानसिक तयारी करून जर आपण प्रेग्नंन्सी ला सामोरे गेलो तर होणारी मानसिक ओढाताण टाळता येईल नाही का?