Pregnancy Check-up, Tests, Sonography to Labor & Delivery Services Under One Roof

आईपण भारी देवा... नवीन_आईपण_पेलताना...

इंस्टाग्राम आणि फेसबुक च्या आजच्या काळात गरोदरपण आणि त्यातले सारे सोहळे साजरे करताना जोडपी किती सुंदर आणि छान दिसतात नाही आणि बाळाच्या आगमनाने तर फेसबुक आणि इंस्टाग्राम , प्रत्येकाचे व्हॉटसअप चे स्टेटस अपडेट्स सार काही आनंदाने ओसंडून वाहत असते...नवजात बाळाचे वेगवेगळे पोझ मधले फोटो, बाळाच्या पहिल्या पावलांचे ठसे फ्रेम करणे, नवजात बाळाला दागिने, प्रॉप्स, पानाफुलांनी सजवून फोटो काढणे , नव्या आईची खोली डेकोरेट करणे,सगळ्यांचे फोन,व्हिडिओ कॉल सगळच अगदी मनभावन छान आणि आनंदी..


या सगळ्या ऑनलाइन आभासी दुनियेमध्ये स्वतःला बाळंतपणा नंतर अप टू डेट ठेवताना नवीन आईची नकळत दमछाक होत असते परंतु तिला या सगळ्याची इतकी आवड किंवा सवय झालेली असते की ते केल्याशिवाय करमत नाही... घरातील मोठे लोक कधी कधी या नवीन 'आई बाबांना' सूचना ही देत असतात परंतु त्याच्याकडेही बरेच वेळा कानाडोळा केला जातो. हे सगळं करत असणाऱ्या नविन आईबाबांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यावर आणि नव्याचे नऊ दिवस संपल्यावर जेव्हा वास्तवाची जाणीव होते त्या वेळेला लक्षात येते की हे नवीन आईपण आणि बाबापण निभावण इतकं सोपं नाही आणि या साठी लागणाऱ्या कष्टांबद्दल आणि द्याव्या लागणाऱ्या वेळेबद्दल आपल्याला कोणीही जागं केलेलं नाही आतापर्यंत डिलिव्हरी होऊन बाळ येणार म्हटल्यावर त्यांनी फक्त आणि फक्त आनंदी बाजूच एकलेली असते

प्रत्यक्षात मात्र बाळाच्या रुटिन बरोबर ताळमेळ साधताना या नवीन आई बाबांची तारांबळ उडायला लागते मग सुरु होते चिडचिड वैताग आणि एक संघर्ष....कधी कधी तर डिप्रेशन आणि त्यामुळे होणारी आई आणि बाळा ची ओढाताण ! आजकाल याच प्रमाण जरा जास्तच वाढलय म्हणून हा लेखन प्रपंच...

नवीन होणारे आई-बाबांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे याची जाणीव घरातील मोठ्यांनी त्यांना करून द्यायला हवी कधी कधी मोठे जाणीव करून देतही असतात परंतु हे नवीन होणारे आई-बाबा या गोष्टी इतक्या मनावर घेत नाहीत. आज यातील काही वास्तववादी गोष्टी इथे मांडते

1. नॉर्मल डिलिव्हरी ही एक नैसर्गिक गोष्ट आहे यामध्ये होणारा त्रास हा प्रत्येकीला कमी जास्त प्रमाणात होत असतो त्याची ठराविक अशी मोजपट्टी नसते काही जणींना डिलिव्हरीच्या कळा सहन होतात तर काहीजणांना याचा खूप त्रास होतो आज-काल वेदना रहित प्रसूती ची सोय आहे तरीही काही ठराविक वेळ तरी या कळा सहन कराव्या लागतात. प्रत्येक मुलीने आपली क्षमता ओळखून डिलिव्हरीच्या कळा काही काळ तरी आपल्याला सहन कराव्या लागणार आहेत याची मानसिक तयारी करायला हवी आणि या सगळ्या गोष्टीची जर मानसिक तयारी नसेल तर तुमच्या डॉक्टरांना तसे स्पष्ट सांगायला हवे.

2. डिलिव्हरी नॉर्मल असो किंवा सिझेरियन त्यावेळी पडणाऱ्या टाके दुखतात आणि त्यावर वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात. डिलिव्हरी नॉर्मल असो किंवा सिझेरियन त्यावेळी पडणाऱ्या टाके दुखतात आणि त्यावर वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात.

3. नवीन बाळाचे काहीही रुटीन नसते सहसा बाळ दिवस भर झोपतात आणि पूर्ण रात्र जागी असतात त्यामुळे सहाजिकच नवीन आई-बाबांचे जवळपास रोजच जागरण होते या जागरणाची नवीन आईला सवय नसल्यामुळे तिची चिडचिड ओढाताण होते तसेच झोप नीट न झाल्यामुळे डोकेदुखी आणि पित्ताचा त्रास होणे या गोष्टीही नवीन आईच्या बाबतीत अगदी कॉमन असतात.

4. नवीन आईने आपला सारावेळा फक्त बाळासाठी आणि स्वतःसाठी राखून ठेवायला हवा आणि बाळ ज्यावेळी झोपेल त्यावेळी स्वतः विश्रांती घ्यायला हवी

5. नवीन आई आणि बाळ यांचे एकमेकांशी जुळून येण्यासाठी वेळ लागतो साधारण सव्वा महिना हळूहळू बाळाचे रुटीन आईला समजायला लागते आणि मग इतर गोष्टी त्याप्रमाणे ऍडजेस्ट करणे सोपे जाते परंतु पहिले सहा महिने अवघडच असतात आणि जागरणाची तयारी या वेळेला ठेवावी लागते.

6. बाळ जर पूर्ण 'ब्रेस्ट फीडिंग' वर असेल तर पहिले सहा महिने आईला बाळापासून अजिबात वेगळे राहणे शक्य होत नाही कारण बाळ भुकेसाठी पूर्णपणे आईवर अवलंबून असते. सतत बाळाचे बरोबर राहणे आणि स्वतःसाठी काहीही करायला न मिळणे यामुळे नवीन आईची चिडचिड होते.

7. कित्येक वेळा आई जेवायला बसले की बाळाचे रडणे आणि शू शी करणे इत्यादीमुळे अर्ध्या जेवणातून आईला उठावे लागते याचीही पहिल्यांदाच आई झालेल्या मुलींना कल्पना नसते

8. डिलिव्हरी नंतर वाढलेले वजन आणि स्वतःच्या दिसण्यात झालेला बदल पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो.डिलिव्हरी नंतर करायचे व्यायाम अनेक ठिकाणी शिकवतात पण खर सांगू का पहिले काही दिवस आईची नीट विश्रांती च होत नाही तर ती व्यायाम करायला शक्ती आणि वेळ कुठून आणणार?

सगळ्यात महत्वाचे आहे तुमचे मानसिक आरोग्य, नीट खाणे आणि विश्रांती ...काही वेळानंतर तुम्ही व्यायाम चालू केला तरी चालेल..

9. वरील सर्व तर रूटीन मध्ये होणारे बदल झाले...या खेरीज बाळ आजारी पडले तर होणारा मानसिक आणि शाररिक त्रास वेगळाच असतो.

10. या सगळ्यातून तरून जाण्यासाठी महत्त्वाची ठरते ती 'सपोर्ट सिस्टीम '..तुम्हाला मदतीसाठी घरातील सदस्य किंवा जर घरातील सदस्यांना शक्य नसेल तर बाहेरुन योग्य मोबदला देऊन अश्या सपोर्ट सिस्टीम' ची सोय करणे गरजेचे आहे.हल्ली डिलिव्हरी नंतर येणाऱ्या डिप्रेशन चे प्रमाण वाढत आहे ते नवीन आईला नसणाऱ्या पूर्वी सारख्या सपोर्ट मुळे..

11. पूर्वीच्या काही पद्धती या सायन्स ला अनुसरून च होत्या...सव्वा महिना बाळंपणानंतर घरा बाहेर न पडणे हे या साठी च पाळत असत की आई आणि बाळाला एकमेकांशी ऍडजस्ट व्हायला पुरेसा वेळ मिळावा...

गार पाण्यात हात घालू न देणे हे देखील या साठी च की नवीन आई घरकाम करण्यात अडकून पडू नये तिने बाळाला आणि स्वतः ला वेळ द्यावा.

आईपण पेलण आणि निभावणं ही तारेवरची कसरत आहे जशी योग्य आहार आणि वेळोवेळी तपासण्या करून तुम्ही सुदृढ बाळाची तयारी करता तशीच डिलिव्हरी नंतरच्या सहा महिन्या साठी कणखर मानसिक तयारीची ही गरज असते. जागरण आणि अपुरी झोप हे पक्के मनात ठसवून पुढे चालत राहावे लागते म्हणजे मग नवीन आईची ओढाताण आणि चिडचिड होत नाही.

तुम्ही हे नवीन आईपण कस पेलल हे आठवतंय का?नक्की तुमचे अनुभव लिहा .इतरांना ही त्याचा उपयोग होईल.

©डॉ. अर्चना बेळवी.

स्त्री रोग तज्ञ

नंदिनी क्लिनिक हडपसर

नंदिनी क्लिनिक वानवडी

फोन 8421119264

Dr Archana belvi Contact Number: 9823426854 | Dr Neelkanth Belvi Contact Number: 9764201811