हल्ली पाळी ला ‘प्रॉब्लेम’ म्हणायची नवीन पद्धत सुरु झालीये.
पेशंटला पाळी कधी आली होती विचारलं की....प्रॉब्लेम ना अं अं....अशी सुरुवात असते किंवा डॉक्टर ‘मला प्रॉब्लेम च्या वेळी फार पोट दुखत’किंवा ‘मला प्रोब्लेम आला नाही या महिन्यात डॉक्टर’ किंवा ‘मला प्रॉब्लेम पुढे ढकलायचा आहे’ इत्यादी इत्यादी ; बायका आणि मुली सहज म्हणून जातात.
आधीच पाळीच्या बाबतीत इतके गैरसमज आहेत त्यात ही नवीन भर !
आपण पाळीला जर प्रॉब्लेम असे नकारात्मक दृष्टीने संबोधले तर आपोआप आपल्या मुलींना ‘पाळी म्हणजे बाईच्या आयुष्यात ला एक मोठा प्रॉब्लेम असतो’ अशी त्यांची नकळत समजूत होईल आणि पाळी कडे त्या त्यांना चिकटलेली एक अडचण म्हणून च बघतील. मग पाळीचे खरे महत्व किती असते याचा विचार त्या करणार नाहीत.
म्हणून प्रजननासाठी आवश्यक असलेल्या पाळीला आज पासून ‘प्रॉब्लेम’ संबोधणे बंद करूयात !