कित्येक वेळा पेशंट त्यांना लिहून दिलेली औषधे योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेवर घेत नाहीत त्यामुळे होते काय की औषधांचा जो अपेक्षित परिणाम आम्हा डॉक्टरांना हवा असतो तो रुग्णावर झालेला दिसत नाही. परिणामत: औषधाचा डोस तरी वाढवावा लागतो किंवा औषध बदलून द्यावे लागते किंवा असलेल्या औषधांमध्ये आणखी औषधाची भर घालावी लागते.
असे कशामुळे होत असावे?तर काहीवेळा रुग्णाला दिलेल्या सूचना तो नीट पणे पाळत नाही किंवा काही वेळा त्याला दिलेल्या सूचना नीट समजत नाहीत किंवा काही वेळा वेळेचे महत्व रुग्णाला माहीतच नसते आणि त्यामुळे तो बहुतेक वेळा औषधे रोज तर घेत असतो परंतु वेळ मात्र पाळत नाही. म्हणूनच आज काही कॉमन औषधे जी बहुदा अनेक रुग्णांना सुरू असतात त्याविषयी काही सूचना लिहाव्या असे वाटले. या कॉमन औषधांना बद्दलच्या काही जनरल सूचना मी तुम्हाला देऊ इच्छिते. अर्थात अंतिम नियम तुमचे डॉक्टर जे तुम्हाला सांगतील तेच पाळायचे आहेत.
१. पित्ता वरील औषधे (ऍसिडिटी साठी च्या गोळ्या)
पित्त अथवा ऍसिडिटी बरी होण्या साठी जी औषधे पोळ्या असतात त्या जेवणापूर्वी अर्धा तास आधी घ्याव्यात सर्वसामान्यपणे बहुतांश औषधे आपण जेवणानंतर घेतो परंतु पित्ता वरील औषधे मात्र जेवणापूर्वी घ्यावी आणि मग जेवण करावे अथवा खावे
२. गरोदर पणातील उलटी साठी देण्यात येणाऱ्या गोळ्या
यामुळेदेखील उपाशीपोटी घ्याव्यात आणि मग अर्ध्या तासाने काहीतरी खाण्याचा प्रयत्न करावा गरोदर महिलांना ही माहिती नसल्यामुळे त्या आधी काहीतरी खातात आणि मग गोळी घेतात त्यामुळे कित्तेकदा त्यांच्या उलट्या थांबत नाही.
३.रक्तवाढीच्या गोळ्या
रक्तवाढी च्या गोळ्या काहीतरी खाऊन 2 तासांनी घ्या खरे तर रक्त वाढीच्या गोळ्या उपाशी पोटी घेणे चांगले . पण या गोळ्या उपाशीपोटी घेतल्यावर पित्ताचा त्रास होतो.या गोळ्यां बरोबर चहा कॉफी असे पदार्थ घेऊ नये येत त्यामुळे रक्त वाढीच्या गोळ्यांचा परिणाम कमी होतो.
४. कॅल्शियमच्या गोळ्यासर्व
साधारणपणे कॅल्शियम ची गोळी की सकाळी घ्यावी दुधाबरोबर ही गोळी घेतली तरी चालेल.
रक्तवाढीची आणि कॅल्शियम ची गोळी एकदम घेऊ नये कारण त्यामुळे दोन्हीचा परिणाम हवा तसा मिळत नाही दोन्ही गोळ्या घेण्यामध्ये साधारण सहा तासाचे तरी अंतर असावे.
५. थायरॉईड साठी च्या गोळ्या
थायरॉईड साठी च्या गोळ्या या दोन प्रकारात मोडतात जर तुमची थायरॉईड ग्रंथी कमी काम करत असेल तर त्यासाठी असणाऱ्या गोळ्या या उपाशीपोटी घ्यायच्या असतात सकाळी उठल्या उठल्या लगेच थायरॉईडची गोळी तोंडात टाकावी आणि नंतर अर्धा तास तरी काहीही खाऊन नये चहा कॉफी सुद्धा घेऊन नये तरच थायरॉईड साठी असणाऱ्या गोळ्यांचा हवा तसा परिणाम दिसून येतो
६. ब्लड प्रेशर साठी च्या गोळ्या
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ब्लड प्रेशर साठी च्या गोळ्या या घरच्या घरी आपले ब्लड प्रेशर तपासून मनानेच बंद करू नयेत जोपर्यंत तुम्हाला डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत या गोळ्या चालूच ठेवावे डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेवरच न चुकता या गोळ्या घेणे आवश्यक आहे. ब्लड प्रेशर च्या गोळ्यांचा डोस कमी जास्त करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांना मदत करू शकता घरच्या घरी तुमचे ब्लडप्रेशर तपासून त्याचा महिनाभराचा चार्ट तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकता.
७. डायबेटिस अर्थात मधुमेहाची औषधे
या बाबतीत असे जनरल विधान करणे अवघड आहे कारण मधुमेहाची अनेक निराळी औषधे असतात. त्यामध्ये गोळ्या इन्सुलिन इत्यादीचा समावेश होतो. काही गोळ्या या जेवणापूर्वी काही गोळ्या जेवणानंतर काही इन्सुलिन जेवणापूर्वी तर काही इन्सुलिन जेवणानंतर घ्यावयाचे असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी दिलेला सल्ला तंतोतंत पाळावा इतकेच सांगेन.
८.हार्मोन्स असलेल्या गोळ्या
यामध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचा समावेश होतो गर्भनिरोधक गोळ्या ही अगदी न चुकता डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे घेणे आवश्यक आहे तसेच या गोळ्या देखील एका ठराविक वेळेला घेणे महत्त्वाचे आहे नवीन असलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये वेळ थोडी पुढेमागे झाली तरी चालते परंतु शक्यतो वेळ एकच ठेवण्याचा प्रयत्न करावा.
९.काही औषधे ही आठवड्यातून एकदा अथवा दोनदा च घ्यायची असतात ती सुद्धा न विसरता मोबाईल मध्ये अलार्म लावून घेणे सोयीचे आहे.
थोडक्यात सांगायचे म्हणजे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला औषधे घेतली तर त्याचा 'गुण' ही चांगलाच येतो आणि औषधाचा डोस वाढवणे किंवा औषध बदलणे टळू शकते. कित्येकदा तर वेळेवर आणि नियमित औषधे घेतली आणि योग्य पथ्य पाळले तर औषधाचा डोस आपण हळूहळू कमी करू शकतो .
चला तर मग आज पासून आपली औषधे नीट घेऊ या!
डॉ. अर्चना बेळवी
स्त्री रोग तज्ञ
पुणे.