वरील वाक्यातील 'मुलगीच'आणि 'मुलगाच' या शब्दातील 'च' हा फार व्यथित करणारा आहे आणि या 'च' मुळे कितीतरी आयांना नैराश्याला सामोरे जावे लागले आहे.
गोष्ट आहे सुधाची.... पहिला मुलगा असलेली सुधा डिलिव्हरी रूम मध्ये प्रसुतीकळा आणि मुलगीच हवी हे स्वप्न घेऊन आली. पूर्ण प्रसूती वेदना सहन करताना आपल्याला मुलगीच हवी हे तिच्या मनात खोलवर रुजले होते. प्रसूती नंतर 'मुलगा' झाल्याचे समजताच ती एकदम रडायला लागली आणि डॉक्टर नाही नाही मला मुलगीच हवी आहे .. पहिला मुलगा आहे ना मला आता दुसरा मुलगा नकोय मी सगळी तयारी मुलीची केली आहे... तिला समजावून सांगताना आम्हा सगळ्यांची दमछाक झाली.
दुसऱ्या दिवशी राऊंड ला गेल्यावर ती सुन्न पणे बसून होती. नवीन बाळ आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर बिलकूल नव्हता... बाळाला मनापासून न स्वीकारल्याने तिला स्तनपान अवघड जात होते... तिचा मोठा मुलगा ही मला हा 'बेबीबॉय' नको मला 'बेबीगर्ल' च हवी म्हणून त्या आपल्या भावंडांला आपलं मानायला तयार नव्हता. आता मात्र वेळीच समुपदेशन केले नाही तर सुधा 'प्रसुतीपश्चात नैराश्याने ' ग्रासून जाईल हे स्पष्ट दिसत होते.
तिला म्हटले बोल सुधा, इतकी मुलीची आस कशी काय निर्माण झाली तुझ्या मनात? ती बोलू लागली ... डॉक्टर मी इंटरनेटवर मुलगी असणे कसे गरजेचे आहे, एकतरी मुलगी असावी, तिला मोठी होताना बघणे हा निखळ आनंद असतो ... तिच्याबरोबर ची गुलाबी स्वप्ने ... ती आई वडिलांची काळजी घेणे .... मुलांपेक्षा ती कशी प्रेमळ असते... कशी घराला घरपण देते ... हे सगळं वाचलंय ... ऐकलय ... व्हिडिओ बघितले आहेत ... मग मलाही मुलगीच असावी असं वाटण काही चुकीचं नाहीये... मला दोन्ही मुलगे नकोत .... मुलगी पाहिजेच.
सुधा म्हणत होती ते खोटे नव्हते.... हल्ली अशा मुलींचे महत्व अधोरेखित करणाऱ्या अनेक पोस्ट इंटरनेट वर फिरत आहेत. त्याचा असाही परिणाम बघायला मिळाला.कित्येकदा तर मुलगा आणि मुलगी ची तुलना करून मुलगीच कशी जास्त प्रेमळ असते हे ठसवण्याचा प्रयत्न ही या पोस्ट मधून होताना दिसतो.तुम्हाला मुलगी नाही....अरेरे! सारखे उद्गार ही ऐकायला मिळतात.
आजच्या युगात जेव्हा मुलगा आणि मुलगी प्रत्येक बाबतीत एकसमान आहेत तेव्हा अशी तुलना करणे योग्य वाटत नाही.
सुधाच्या बरोबर उलटी केस होते सुनीताची! व्यवसायाने परिचारिका असणाऱ्या सुनीताला पहिली मुलगी होती.त्यामुळे आता दुसऱ्या वेळी 'मुलगाच' व्हायला हवा हे तिने आणि तिच्या सासरच्या लोकांनी मनाशी पक्के ठरवले होते. डिलिव्हरी नंतर मुलगी झाल्यावर आपल्याला दुसरी मुलगी झाली आहे हे परिचारिका असूनही सुनिता मान्य करायला तयार नव्हती. प्रसूती झाल्यावर," काय झाले डॉक्टर मला? मुलगाच असणार; म्हणूनच इतका प्रसूती वेदनांचा त्रास झाला मला"हेच तिचे पहिले वाक्य होते. मुलगी झाली आहे म्हटल्यानंतर तिने जोरात रडायला सुरुवात केली.बाळाकडे नीट लक्ष न देणे, स्तनपान वेळेवर न करणे , कारण नसताना रडणे अशी प्रसूतीपश्चात नैराश्याची लक्षणे ती दाखवू लागली.
लग्नानंतर किती अपत्ये असावीत? मुळातच अपत्य असावे की नाही? हे अगदी वैयक्तीक प्रश्न आहेत.
सर्वसाधारण पणे दोन अपत्ये असावीत आणि एक मुलगी आणि मुलगा असावा जेणे करून दोघांनाही मोठे करण्याचा निखळ आनंद घेता यावा असे वाटणे हे स्वाभाविक आहे.
पण एकच मुलगा किंवा मुलगी असणे किंवा दोन्ही मुले अथवा दोन्ही मुली असणे म्हणजे तुम्ही काहीतरी गमावता आहात असे चित्र हल्ली उभे केले जाते.मग त्याला सुधा आणि सुनीता सारख्या मुली बळी पडतात.
प्रत्येक मुलगीच मुलापेक्षा प्रेमळ असेल असे ही नाही ... मुले ही मुली इतकीच आईवडिलांच्या बाबतीत हळवी असतात. (ज्यांना दोन मुले आहेत त्या आया त्यांचे अनुभव आपल्या बरोबर 'शेअर' करतील)
आपल्याकडे पितृसत्ताक पद्धत असल्यामुळे पूर्वी मुलांना मुलींपेक्षा वंशाचा दिवा म्हणून जास्त महत्त्व होते यामुळे प्रत्येकाला मुलगाच हवा असायचा परिणाम असा झाला की मुलगा आणि मुलगी यांच्यातील गुणोत्तर बदलत गेले आणि मुलींची संख्या कमी कमी होत गेली (आज महाराष्ट्रात प्रत्येक हजार मुला पाठीमागे साधारण 875 मुली आहेत) हे प्रमाण समतोल राखण्यासाठी मग बेटी बचाओ , कन्या सुरक्षा योजना, मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देई दोन्ही घरी, बेटी म्हणजे धनाची पेटी यासारख्या मुलीचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या अनेक योजना आणि घोषवाक्य सामान्य जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला. याचा चांगला परिणाम नक्कीच दिसून आला. यातून अपेक्षित होते ते स्त्री-पुरुष समानता म्हणजेच जेंडर इक्वलिटी!
पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच..... वेगवेगळ्या पोस्ट मधून मुलगा आणि मुलगी यांची तुलना करणे आणि त्यामध्ये मुली मुलांपेक्षा कशा प्रेमळ असतात हे सतत दाखवणे यामुळे आपल्याला अपेक्षित असणारी स्त्री पुरुष समानता साध्य होताना दिसत नाही.एकाला दुसऱ्या पेक्षा वरचढ दाखवून ही समानता साध्य ही होणार नाही.
दुसरीकडे अजूनही काहीही झाले तरी मुलगा हवाच असे मानणारा एक वर्ग आजही अस्तित्वात आहे.त्यांच्या लेखी मुलींना अजूनही 'दुय्यम' स्थान आहे.
आज आपण अशा ठिकाणी येऊन पोचलो आहोत की त्यामध्ये मुलगाच किंवा मुलगीच हवी असे म्हणण्यापेक्षा मला चांगले अपत्य किंवा अपत्ये हवी मग ती मुलगा असो की मुलगी काहीही चालेल असे म्हणणे जास्त योग्य होईल. मुलगा असो किंवा मुलगी त्यांची आईवडिलांच्या बद्दल ची आस्था(attachment) ही त्याच्या संगोपनावर (upbringing) वर अवलंबून असते . तो मुलगा आहे किंवा मुलगी आहे यामुळे ती कमीजास्त होत नाही. हा 'च' मनात धरल्यामुळे फक्त गरोदर स्त्री नाही तर इतरही लोक नकळत यामध्ये ओढले जातात जसा सुधाचा लहान मुलगा ही नवीन बाळाला तो मुलगा आहे म्हणून स्वीकारायला तयार होत नव्हता.
वेळीच योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे सुधा आणि सुनीता प्रसूतीपश्चात नैराश्यातून चटकन बाहेर आल्या हे वेगळे सांगायला नको.