ऋतुजा अतिशय हुशार आणि स्वतः चा हुशारीने कंपनीत अगदी चांगल्या पोस्टवर ...वय वर्ष ३२..सगळं अगदी छान होत ... खटकणारी गोष्ट एकच ऋतुजा लग्नाला तयारच होत नव्हती कारण ज्या पोस्टवर ती काम करत होते त्या पोस्टमुळे तिला घरातले काहीही करायला वेळ मिळायचा नाही.१००% योगदान कामाच्या ठिकाणी दिल्यावर घरी कोणतेही काम करणे अवघड जायचे तिला. त्यामुळे लग्नाची जबाबदारी घेणं तिला नको वाटत होतं.आई वडील लग्नाचे सांगून कंटाळले होते..बाकीचे नातेवाईक ही लग्न या विषयावर तिला सतत प्रश्र्न विचारात आणि सल्ले देत. या सगळ्याला ती कंटाळली होती केवळ लग्न न केल्यामुळे तिच्या करियर मधील कर्तृत्व सुद्धा समाजात कौतुकास पात्र होत नाहीये अशी तिला टोचणी लागायची ...संधी मिळताच ती परदेशात निघून गेली ती कायमचीच. तिकडे लग्नावरून तिला judge करणारे कोणी नव्हते त्यामुळे ती समाधानाने रहायची.
दुसरी गोष्ट मीनल आणि केदार ची ... दोघेही करियर मध्ये उत्तम पदावर ...घरात लक्ष्मी पाणी भरत होती..सकाळी ८ ते रात्री ८ दोघे busy सकाळी काम सुरू केले की रात्री च भेटत घरी कोणी नसे दिवसभर .लग्नाला ७ वर्षे झाली होती तरी घरी पाळणा हलला नव्हता. दोघांनाही करिअर मधून वेळ नसल्यामुळे मुलाची जबाबदारी त्यांना नको वाटत होती. मुलाकडे दिवसभर बघणार कोण हा प्रश्नच होता. त्यामुळे मुले नकोत असा निर्णय त्यांनी घेतला होता. परंतु घरातील मोठे लोक आणि नातेवाईक पुन्हा पुन्हा त्यांना मूल होण्याबद्दल विचारत दोघांपैकी कोणामध्ये तरी काही तरी व्यंग असेल असा कयास बांधत. लोकांच्या प्रश्नाला उत्तरे देऊन आणि त्यांना समजावून सांगून ते दोघे कंटाळले होते .संधी मिळताच त्यांनी सुद्धा परदेशी जाण्याचा मार्ग पत्करला आणि ते परदेशात कायमचे स्थिरावले.
तिसरी गोष्ट संजय आणि रूपाली ची .....आई वडील आणि दोन गोंडस मुलांच्या बरोबर संजय आणि रूपाली शहरात टू बीएचके फ्लॅटमध्ये राहत असत जशी जशी मुले मोठी होऊ लागली तशी तशी घरातील जागा कमी पडायला लागल्यामुळे त्यांची कुचंबणा होऊ लागली सारखे सगळे एकमेकांच्या आजूबाजूला त्यामुळे कोणालाही स्वतःची अशी स्पेस मिळत नसे. आजी-आजोबा आणि नातवंडे यांच्यामध्ये देखील वैचारिक मतभेद होत असत. या साऱ्यांमुळे रूपाली आणि संजय ची मानसिक ओढाताण होत असे घरातून वेगळे होऊन दुसरीकडे राहायचा विषय निघाला की आई-वडील आणि इतर नातेवाईक त्या दोघांनाही नावे ठेवत असत. म्हातारपणी आई वडिलांना सोडून दुसरे बिऱ्हाड करायला निघाले म्हणून टोचून बोलत. संजयला चांगली संधी मिळताच त्याने देखील आपला भारत देश सोडून परदेशात स्थायिक होण्याचे ठरवले भारतामध्ये आई-वडिलांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतल्यावर नावे ठेवणारे नातेवाईक परदेशात जाणाऱ्या संजय ला मात्र काही बोलले नाहीत उलट त्याच्या करिअर बद्दल कौतुकच केले.
लग्न करणे, मुले होऊ देणे आणि एकमेकांचे पटत नसेल तर एकत्र कुटुंबात राहणे या तिन्ही मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. प्रत्येकाला या जबाबदाऱ्या निभावणे जमेलच असे नाही लग्न केल्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या कैक कपटीने वाढतात आणि करिअरच्या चढत्या आलेखा बरोबर कित्येक वेळा मुलींना या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे जमत नाही आणि मग सुरू होते ती ओढाताण त्यापेक्षा लग्न न करणे त्यांना सोपे वाटते म्हणजे मग करिअरकडे पूर्ण लक्ष देता येते.
मूल होऊ देणे अथवा न देणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मुले झाल्यावर सुद्धा मुलांची आर्थिक तसेच मानसिक जबाबदारी घेणे आणि त्यासाठी पुरेसा वेळ देणे प्रत्येकाला जमेलच असे नाही तसेच प्रत्येकाचा इमोशनल इंडेक्स वेगवेगळ्या असतो एखाद्या जोडप्याला मुले होऊ देणे जितके भावनात्मक वाटत असेल तितके ते दुसऱ्या जोडप्याला वाटेलच असे नाही. आणि जर मुलांच्या बरोबर भावनिक भावबंध निर्माण होणार नसतील तर ती एक मोठी जबाबदारीच होऊन बसते. मुले मोठी करताना कराव्या लागणाऱ्या तडजोडी करण्यासाठी प्रत्येक जण तितक्याच आनंदाने तयार असेल असे नाही.
एकत्र कुटुंबाचे चित्र कितीही आनंददायी वाटत असले तरी प्रत्यक्षात एकत्र कुटुंबात राहताना त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला अनेक तडजोडी कराव्या लागतात ठराविक परिस्थितीमध्ये एका मर्यादेपर्यंत कुटुंबातील प्रत्येक सदस्य मग तो लहान असेल किंवा मोठा असेल तडजोड करू शकतो. परंतु एका ठराविक मर्यादेच्या नंतर तडजोडी करणे प्रत्येकालाच अवघड होऊन बसते आणि मग सुरू होतो तो संघर्ष...
वरील तीनही कथांच्या मध्ये समाजापुढे हतबल होऊन परदेशात स्थायिक होण्याचा मार्ग प्रत्येकाने निवडला. कुटुंब व्यवस्था ही आपल्या भारतीय समाज रचनेचा पाया आणि गाभा आहे. आणखी खोलात जाऊन विचार केला तर उत्क्रांती मध्ये प्रत्येक प्राण्याला आपली प्रजाती निसर्गामध्ये टिकवण्यासाठी प्रजनन ही अत्यावश्यक गोष्ट आहे. प्रजननासाठी स्त्री आणि पुरुषाने एकत्र येऊन सुदृढ नवीन जीव निर्माण करणे आवश्यक असते तरच निसर्गाच्या शक्ती पुढे मनुष्य प्रजाती टिकून राहील. निसर्ग शक्ती पुढे स्वतःची प्रजाती टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या या प्रजननाला आपल्या पूर्वजांनी सुसंस्कृत रूप दिले हे सुसंस्कृत रूप म्हणजे कुटुंब व्यवस्था. थोडक्यात कुटुंब व्यवस्थेचा गाभा किंवा मुख्य उद्देश हा प्रजनन अर्थातच मुलांना जन्म देणे हा आहे. सभ्यतेने मुलांना जन्म देण्यासाठी लग्न व्यवस्था निर्माण झाली यामध्ये आपल्या जोडीदाराबरोबर एकनिष्ठ राहण्याबरोबरच जोडीदाराच्या कुटुंबाची जबाबदारी घेणे आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्र राहणे हा उद्देश होता. एकत्र राहिल्यामुळे कुटुंबातील नवीन जीवांची काळजी घेणे आणि त्यांना सुरक्षित ठेवणे शक्य होत असेहे सगळे ज्या वेळेला निर्माण झाले तो काळ वेगळा होता त्यावेळी बाह्य परिस्थिती वेगळी होती ज्यामध्ये सुरक्षितता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता स्वतःचे अस्तित्व निसर्गामध्ये टिकवून ठेवण्यासाठी(अगदी सुरुवातीच्या काळात इतर प्राण्यांकडून कुटुंबावर हल्ला होण्याची शक्यता असे तर नंतरच्या काळात अनेक लढाया आणि माणसा माणसातील संघर्ष यापासून स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणे गरजेचे असे) . त्या काळामध्ये पुरुष हे कुटुंबासाठी बाहेरील सर्व कामे करत ज्यामध्ये अर्थार्जन हेही काम होते स्त्रिया कुटुंबामध्ये राहून कुटुंबातील नवीन जीवांची आणि ज्येष्ठांची काळजी घेत असत.
थोडक्यात माणसाच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी प्रजनन अर्थातच मुले होऊ देणे आणि प्रजनन सभ्य रीतीने करता येण्यासाठी लग्न तसेच पुढच्या पिढीच्या योग्य वाढीसाठी बाह्य गोष्टींपासून सुरक्षितता आणि चांगले वातावरण मिळावे म्हणून एकत्र कुटुंब पद्धती हा या तिन्ही गोष्टींचा मूळ उद्देश होता.काळ बदलला माणूस प्रगत होत गेला प्रगत समाजाची निर्मिती झाली. माणसाच्या जीवनात स्थिरता आणि सुरक्षितता आली प्रगत समाजात स्वतःच्या टिकून राहण्यासाठी माणसाला करावा लागणार शारीरिक संघर्ष कमी झाला सहाजिकच पूर्वीसारखे मोठ्या कुटुंबात एकत्र राहण्याची गरज कमी होत गेली. लग्न,मुले होऊ देणे आणि एकत्र कुटुंब पद्धती याचा मूळ उद्देश या काळात आपण विसरलो. बाह्य परिस्थिती बदलली तरी मानसिकरित्या आपण लग्न , मुलांना जन्म देणे आणि एकत्र कुटुंब पद्धती यांना घट्ट पकडून ठेवले. ज्या प्रमाणात आपली प्रगती झाली त्या प्रमाणात आपण या चालीरीतींमध्ये वैचारिक प्रगती करू शकलो नाही. त्यामुळे ह्या गोष्टींच्या बंधनात आपण सारासार विचार न करता अडकलो आणि त्याची प्रत्येकाला जबरदस्ती करू लागलो आणि अशा पद्धतीने वागणाराच चांगला असेआपल्या सर्वांच्या मनावर आपोआप ठसत गेले. एखाद्याने लग्न नको ; मुले नकोत किंवा एकत्र कुटुंबातून वेगळे व्हायचे म्हटल्यावर आपल्याला ते पचवणे भारतीय समाज व्यवस्थेत अवघड जाऊ लागले. सहाजिकच नवीन पिढीला याचे जोखड वाटू लागले कारण मुळातच त्यांना स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या अस्तित्वासाठी किंवा सुरक्षिततेसाठी शारीरिक संघर्षाला सामोरे जायचे नव्हते. आर्थिक दृष्ट्याही नवीन पिढी स्वावलंबी होऊ लागली त्यामुळे पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा हे लोक मुक्तपणे विचार करू लागले . यातून वैचारिक संघर्ष निर्माण झाला आणि समाजाचा आणि कुटुंब व्यवस्थेचा समतोल बिघडू लागला. वैचारिक संघर्ष करत बसण्यापेक्षा नवीन पिढीने परदेशात जाऊन शांतपणे जीवन व्यतीत करणे हा मार्ग स्वीकारायला सुरुवात केली .
या सगळ्याचा विचार करून सुवर्णमध्य साधताना काही गोष्टी मांडाव्याशा वाटतात
1. आज काल जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असतात त्या वेळेला लग्न आणि त्याबरोबर येणाऱ्या इतर जबाबदाऱ्या प्रत्येकाला स्वीकारणे शक्य असतेच असे नाही. लग्नाचे जसे फायदे असतात तसेच लग्न बरोबर येणाऱ्या अनेक सामाजिक आणि कौटुंबिक तसेच आर्थिक जबाबदाऱ्या ही असतात. आई-वडिलांनी मुलांची याबाबतीत खुली चर्चा करायला हवी आणि मग त्यांना निर्णय घेण्याची मोकळीक द्यायला हवी.
2. वर म्हटल्याप्रमाणे मुलांना जन्म देणे आणि त्यांची भावनिक आर्थिक जबाबदारी घेणे आणि त्यांच्यासाठी वेळ देणे हे एक मोठे प्रोजेक्ट आहे म्हटले तरी चालेल. ज्यावेळी दोघेही बारा बारा तास घराबाहेर राहून काम करत असतात आणि विभक्त कुटुंब पद्धती मध्ये राहत असतात त्या वेळेला हे जबाबदारी कित्येक जोडप्यांना नकोशी वाटते कारण ते त्यासाठी योग्य तो न्याय आणि वेळ देऊ शकत नाहीत. नेहमीपेक्षा असा वेगळा विचार करणाऱ्या जोडप्यांना सामाजिक दबाव वाटायला नको याची काळजी घ्यायला पाहिजे
3. शहरात लहान लहान होत चाललेली घरे आणि वाढत चाललेले आयुर्मान यामुळे एकत्र कुटुंब पद्धती प्रत्येक वेळेला आनंददायक असेल असे नाही.प्रत्येक कुटुंबातील अडचणी आणि कुटुंबातील एकमेकांशी जुळवून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते.वेळप्रसंगी आनंदाने एकमेकांपासून लांब राहून सर्वांनीच सुखी राहिलेले चांगले आणि हे मनापासून स्वीकारलेले चांगले.कुटुंब बाहेरील इतर लोकांना कित्येक गोष्टी दिसतात तितक्या त्या साध्या नसतात
4. सामाजिक फायदे तोटे जसे असतात तसेच या गोष्टींचे वैद्यकीय फायदे तोटेही असतात. त्यामुळे जर तुम्ही मूल नको असा निर्णय घेत असाल तर तुमच्या स्त्रीरोग तज्ञांना भेटून काही ठराविक तपासण्या योग्य वेळी करून घेणे तुमच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी गरजेचे असते. ज्या स्त्रिया मुलांना जन्म देत नाहीत आणि स्तनपान करत नाहीत अशा स्त्रियांमध्ये गर्भपिशवीचा कर्करोग आणि स्तनांचा कर्करोग याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे अशा स्त्रियांनी वेळोवेळी स्वतःच्या वैद्यकीय तपासण्या करून घेणे गरजेचे आहे.
5. तुम्ही लग्न करणार नसाल आणि तुम्हाला मुल नको असेल किंवा तुम्ही विभक्त कुटुंब पद्धतीचा अवलंब करणारा असाल तर मानसिक दृष्ट्या ही तुम्हाला खंबीर राहणे गरजेचे आहे. कधीकधी अशा लोकांना बाकीच्या ग्रुपमध्ये मिसळणे अवघड पडते कारण लग्न झाल्यावर आणि मुले झाल्यावर तुमच्या मित्र-मैत्रिणींच्या प्रायोरिटीज बदलतात त्यामुळे एकटेपणा येण्याची शक्यता असते याबद्दलही विचार करून ठेवायला हवा.
6. घरातील मोठ्या व्यक्तीचे सांगत असतात ते त्यांच्या जीवनाच्या अनुभवावरून आपल्याला सांगत असतात आपल्याला त्यांच्याविरुद्ध निर्णय घ्यायचा असेल तर नाण्याच्या दोन्ही बाजू जाणून घेऊन मग निर्णय घेणे केव्हाही चांगले.
थोडक्यात एकमेकांच्या मतांचा आदर प्रत्येकाने केला तर तणाव मुक्त समाजाची निर्मिती होईल आणि निदान हतबलता येऊन तरी लग्न ,मूल न होऊ देणे आणि विभक्त कुटुंब पद्धती या करता परदेशात जाऊन जीवन जगण्याचा मार्ग आपले लोक स्वीकारणार नाहीत.
©डॉ. अर्चना बेळवी.
स्त्री रोग तज्ञ
वानवडी और हडपसर पुणे।